भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा
देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजीमध्ये कार्यक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील समाजशास्त्र विभाग व एन. एस. एस विभाग यांच्यावतीने देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक सुधारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी हक्कांचे रक्षण, पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि सामाजिक शोषणाविरुद्ध संघर्ष या बाबींवर केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी करण्यात आले.
समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.अभिजीत पाटील यांनी स्वागतपर भाषण करताना बिरसा मुंडांनी आदिवासी समाजाला दिलेल्या संघर्षशील नेतृत्वाची आणि ‘उलगुलान’ चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचेच नव्हे तर भारताच्या सामाजिक न्याय चळवळीचे तेजस्वी प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला नितांत गरज आहे.”
या निमित्ताने महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना, त्यांची नेतृत्वशैली, आदिवासींच्या समस्यांवरील उपाययोजना आणि आधुनिक भारतातील आदिवासी प्रश्न या विषयांवर माहितीपूर्ण पोस्टर बनवली होती. पोस्टर स्पर्धेचे आयोजन समाजशास्त्र विभाग व भित्तीपत्रिका विभाग यांच्यावतीने करण्यात आले.
पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज यांच्या हस्ते करण्यात आले पोस्टर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्वागत प्रा. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण पोवार यांनी मानले.
मुख्य व्याख्यान सत्रात प्रमुख पाहुणे डी. एम. महाले यांनी बिरसा मुंडांचे सामाजिक विचार, ब्रिटिश सत्तेविरुद्धचा त्यांचा सशस्त्र लढा आणि आदिवासींच्या सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी म्हटले की, “बिरसा मुंडांचे कार्य म्हणजे अत्याचाराविरुद्धचा धैर्यपूर्ण संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक. त्यांची जयंती ही फक्त स्मरणाची नव्हे तर कृतीची प्रेरणा देणारी संधी आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज यांनी यावेळी बिरसा मुंडांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातून सामाजिक न्याय, समानता आणि पर्यावरणसंरक्षणाचे मूल्य आत्मसात करणे हेच या जनजाती गौरव दिनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अभिजीत पाटील यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. सौरभ पाटणकर यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जीवन पाटील यांनी केले तर प्रा. डॉ माधव मुंडकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. आर व्ही सपकाळ, प्रा. डॉ. प्रवीण पोवार, प्रा. प्रमोद काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अभिजीत पाटील यांनी केले.


