श्रीम.लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरात बालदीन उत्साहात साजरा

0
नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे बालदीन झाला खास

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे ॲड. अजित आनंदा मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर, (प्रतिनिधी)  (मनपा) लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरात बालदिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. बालदिनानिमित्त भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे ॲड. अजित आनंदा मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कुमारी इरा मेवेकरी हिने पंडित नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून का साजरा केला जातो, तसेच त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय सुंदररीत्या मांडला.

       बालदिनाचे औचित्य साधत इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांची डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच इयत्ता तिसरी व पाचवी वर्गाच्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी ओडिशा राज्याची विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

     आजच्या दिवसाच्या औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शाळेत मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या वतीने ‘अभ्यास यशाचे विज्ञान’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख व्याख्याते माननीय श्री. शार्दुल मुजुमदार उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रयोग केंद्रातील अभ्यासक श्री. यशवंत पाटील, सौ. नंदा घोडींबे आणि सौ. सुप्रिया वरखडे, दिपाली वढावकर यांचीही उपस्थिती होती.

    व्याख्यात्यांनी पोस्टर प्रेझेन्टेशनसह अभ्यास करण्याच्या शास्त्रीय पद्धती, योग्य वेळ, योग्य जागा, अभ्यासापूर्वीचे वॉर्म-अप, एकाग्रता, सातत्य आणि चिकाटीचे महत्व अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले. अभ्यास लक्षात राहण्यासाठी काही कृती, तंत्रे आणि प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले.

   विद्यार्थ्यांचा निश्चय कसा असावा, मनोबल कसे वाढवावे याविषयी त्यांनी गोष्टी सांगत अतिशय सुंदर संवाद साधला. छोट्या श्रोत्यांनाही त्यांनी बोलते करत ‘अभ्यास यशाचे विज्ञान’ हे अत्यंत सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत या संवादात भाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निश्चितच अभ्यासाची दिशा व प्रेरणा मिळाली.

  या सर्व आयोजनासाठी केंद्र मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. युवराज सरनाईक सर यांनी केले व व्याख्यात्यांची ओळख करून दिली. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शिवाजी पाटील,श्री. उमेश गाताडे, सौ. सुवर्णा सोनाळकर, सौ पल्लवी देसाई, दिग्विजय नाईक, सुजाता दाभोळकर, ज्योती उबाळे व सौ. पल्लवी काळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *