शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करून दिवसा वीज द्या अन्यथा तीव्र आंदोलन – विजयराव खोत
शित्तूर-वारुण, (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील सर्व गावामध्ये खंडित असलेला शेतीपंपाचा विद्युत पुरवठा नियमित करून शेतीसाठी रात्री असलेला विजपुरवठा दिवसा करावा अन्यथा 5 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा शाहूवाडी तालुक्याचे माजी सभापती विजयराव खोत यांनी तहसीलदार शाहूवाडी आणि पोलीस निरीक्षक शाहूवाडी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, चालू वर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठी असलेले विजेचे पोल पडल्यामुळे आणि विजवाहक तारा तुटल्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे शेतीपम्प सद्या बंद आहेत.ऊसतोडणी हंगाम सुरु असल्यामुळे हंगामी पिके पाण्याविना घेणे शक्य होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये हिंस्त्र वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मोठया प्रमाणात वाढ झाली असून रात्री – अपरात्री अंधारात शेतीला पाणी देणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे शेतीपंपासाठी महावितरण कडून रात्री करण्यात येणारा विजपुरवठा दिवसा करावा अशी मागणी तालुक्यातील समस्त शेतकरी वर्गातून होत आहे.
सदरच्या निवेदनातील मागणी संदर्भात योग्य विचार व्हावा व महावितरण कडून योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी शाहूवाडी- पन्हाळ्याचे माजी आम. सत्यजित पाटील, उदय सहकारी साखर कारखान्याचे चेरमन मानसिंगराव गायकवाड आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई. भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालय शाहूवाडी यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शाहूवाडी तालुक्याचे माजी सभापती विजयराव खोत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदरच्या निवेदनावर विजयराव खोत, नामदेव गिरी, हंबीरराव पाटील, दत्तात्रय पोवार,जालिंदर पाटील,राजेंद्र सुतार यांच्या सह्या आहेत.
महावितरण तर्फे शाहूवाडी, मांजरे, थावडे व वारूळ उपकेंद्र मधून शेतीपंप साठी दिवसा वीज पुरवठा गेल्या महिन्यापासून केला जात आहे. पावसाळा मध्ये पडलेले व खराब झालेले पोल , DP बदलणे काम सुरू आहे. ज्या भागातील विद्युत पुरवठा अजून सुरू झालेला नाही तेथील दुरुस्ती काम सुरू आहे. दोन दिवसात सर्व भागातील शेतीपंप विद्युत पुरवठा सुरू झालेला असेल. अशी माहीती प्रवीण कुंभारे – (उप अभियंता महावितरण कार्यालय शाहूवाडी) यांनी दिली.


