आनंददायी आयुष्यासाठी कलेशी मैत्री आवश्यक : गणेश चिंचकर
मिमिक्री : तिकीट टू स्टारडम एंड सक्सेस
कोल्हापूर (प्रतिनिधी) आजच्या युगात आपण कोणत्या ना कोणत्या कलेशी मैत्री करायला हवी. कलेशी केलेली मैत्री तुम्हाला आनंद तर देतेच पण भविष्यातील रोजगाराची संधीही कलेच्या मैत्रीमुळे उपलब्ध होईल असे मत प्रसिद्ध नकलाकार गणेश चिंचकर यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या आर्ट्स क्लब, सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मिमिक्री : तिकीट टू स्टारडम एंड सक्सेस ह्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर उलघडून दाखवला. हा प्रवास उलघडून दाखवत असताना कार्टून मालिकेतील पात्रे, प्रसिद्ध राजकीय नेते आणि मराठी अभिनेते यांचे आवाज काढून दाखवले. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अलीकडे उपलब्ध असलेल्या समाजमाध्यमाच्यामुळे तुम्हाला तुमची कला जगभर घेवून जाण्याची संधी आहे. आपण त्यासाठी स्वत:तील कलागुणांचा विकास करावा. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नकला ह्या प्रकारातील रोजगारांच्या संधीची माहिती व्हावी व युवा महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा असा दुहेरी हेतूने महाविद्यालयात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परस्परसंवादी पद्धतीने पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धार्थ सनदी यांनेही वेगवेगळे आवाज काढून दाखवले. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्ट्स क्लबच्या प्रमुख प्रो. डॉ. मनिषा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डी. ए. माळवेकर यांनी केले. ह्या व्याख्यानास महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. यु. एस. शेळके, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे , वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, विविध विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


