परिवर्तन चळवळीला गती हीच बाबांना श्रद्धांजली – माजी आमदार प्रा. सुभाष जोशी 

0
IMG-20251212-WA0164

निपाणी प्रतिनिधी 

डॉ. बाबा आढाव हे कष्टकऱ्यांचा आवाज आणि चळवळींचा आधार होते. त्यांच्या पुढाकारामुळे कर्नाटक सरकारला देवदासी प्रतिबंधक कायदा करावा लागला. महाराष्ट्र सरकारला माथाडी कामगार आणि घर कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करावा लागला. बाबांचे निपाणी, गडहिंग्लज आणि कोल्हापूरचे अतूट नाते होते. सत्ता असल्याशिवाय क्रांती होत नाही, हा विचार डॉ. बाबा आढाव यांनी खोडून काढला. ते खऱ्या अर्थाने लोकनेता होते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यामागे खंबीर ताकद बाबांची होती. परिवर्तनाची चळवळ गतिमान करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी केले. 

निपाणीत पुरोगामी कार्यकर्त्यांच्यावतीने डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबा आढाव यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले यानंतर दोन मिनिटे मौन पळून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

प्रा जोशी पुढे म्हणाले, 1980 पूर्वी माझी व डॉ. बाबा आढाव यांची ओळख होती. बाबांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी घेतलेल्या विषमता निर्मूलन परिषदेत आपण सहभागी झालो. अलीकडच्या काळात चळवळींची धार क्षीण होत असून तरुणांनी चळवळ टिकवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. 

प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, निपाणीतील तंबाखू आंदोलन, देवदासी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, बेरड रामोशी परिषद यासारख्या अनेक चळवळींमध्ये बाबा आढाव यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात हमाल, कष्टकरी, भंगारवाले यांची संघटना निर्माण केली. त्यांच्या निधनाने हजारो कष्टकऱ्यांचा अन्नदाता गेल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रा. सुरेश कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा. एन. डी. जत्राटकर, प्रा.जे.डी. कांबळे, नानासाहेब जामदार, कबीर वराळे, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. आर. के. दिवाकर, वसंत नगरे, प्राचार्य एम. आर. ढेकळे, अजित पाटील, तुकाराम कोळी, जयराम मिरजकर, सुधाकर माने, राजू खराबे, चंद्रकला संकपाळ, शितल शिप्पूरकर, प्रा. कांचन बिरनाळे, इर्शाद कोचरगी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आनंद संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *