STR -05 तारा वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात मुक्त
वनविभागाच्या आरक्षित कंपाउंड मध्ये निगराणीखाली होती
शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नियंत्रित पिंजरा (Soft Release Enclosure) मध्ये ठेवण्यात आलेली वाघीण STR –05 (तारा )हिला शनिवार दिनांक 13.12.2025 रोजी सकाळी 7 वाजता चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते. मात्र सदर वाघीण त्याच एनक्लोजर मध्ये आत फिरत होती. तिने आत मध्ये शिकार केली होती व ते खाऊन तेथेच राहीली. दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही. आज दिनांक 18.12.2025 रोजी
सकाळी 7 वाजता ती अत्यंत डौलदारपणे एनक्लोजर मधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली.चांदोलीत आगमनानंतर वाघीणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व habituation प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी (WII) यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. मुक्तते नंतर STR -05 (तारा ) या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार असून ती नैसर्गिक अधिवासाशी सहज जुळवून घेत आहे याची खात्री केली जाणार आहे. महाराष्ट्र वन विभाग सह्याद्री परिसरात शास्त्रीय, नैतिक व संवर्धनाभिमुख वन्यजीव व्यवस्थापन राबविण्यास कटीबद्ध असल्याचे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्था चे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील , सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, अजितकुमार पाटील,वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील(चांदोली), प्रदीप कोकीटकर (आंबा) व वनपाल वनरक्षक सहभागी होते.
व्याघ्रिणी STR-05 (तारा) हिने सॉफ्ट रिलीज कालावधीत अतिशय उत्तम प्रकारे नैसर्गिक वर्तन प्रदर्शित केले आहे. पिंजऱ्यात स्वतः शिकार करून तिने तिची शारीरिक तंदुरुस्ती व जंगलात स्वतंत्र जीवनासाठीची तयारी सिद्ध केली आहे. तिची आजची मुक्तता ही सह्याद्री परिसरात टिकाऊ व्याघ्र लोकसंख्या उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे अशी माहीती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दिली.


