जरग विद्यामंदिर मधून घडलेले विद्यार्थी म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचा मापदंड – डी. सी. कुंभार
प्रसाद चंदर साठे याची भारतीय वायूदलात फ्लाईंग ऑफिसर पदी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर मनपाच्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद चंदर साठे यांची नुकतीच भारतीय वायूदलात फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झाली. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात डी. सी. कुंभार बोलत होते.
ते पुढे म्हणाले एखाद्या शाळेची खरी गुणवत्ता ही त्या शाळेतून घडलेल्या विद्यार्थ्यांवरूनच ठरते. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरची शैक्षणिक गुणवत्ता आज यशोशिखरावर पोहोचली असून येथील विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुडभरारी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार डी. सी. कुंभार यांनी काढले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने प्रसाद साठे यांचे झांज, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी गौरवचिन्ह, मानाचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रसाद साठे यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, आई-वडील तसेच मामा यांना दिले. “शाळेने घातलेल्या भक्कम पायावरच आज मी उभा आहे. लहानपणीच स्पर्धा परीक्षांची लागलेली आवड, गुरूंचे योग्य मार्गदर्शन, देशभक्तीची स्वप्ने, बाळगलेली जिद्द व घेतलेले परिश्रम यामुळेच हे यश मिळू शकले,” असे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे म्हणाल्या, “शाळेने लावलेल्या ज्ञानरूपी रोपट्याचे प्रसादच्या रूपाने आज वटवृक्षात रूपांतर होताना पाहत आहोत.” या कार्यक्रमात प्रसाद साठे यांचे वर्गशिक्षक बी. आर. पिंपळकर, मार्गदर्शक संजय पाटील, युवराज सरनाईक आणि उमेश गाताडे यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. पिंपळकर यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर यांनी केले, तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संध्या देवडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, सदस्य प्रियांका पुंदीकर, शुभांगी बन्ने, विमल गवळी, वसंत आडके, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


