निपाणीत 27 रोजी मराठा समाजाचा भव्य मेळावा
मंत्री संतोष लाड, श्रीमंत पाटील मार्गदर्शन करणार
निपाणी, (प्रतिनिधी)-
निपाणी तालुक्यातील बहुसंख्य असणारा मराठा समाज एकजुट व्हावा. पिछाडीवर आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रवाहात यावा. याकरीता त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरीता निपाणी तालुका मराठा समाजाच्या वतीने येत्या शनिवार दि. 27 रोजी सायंकाळी 4 वाजता मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील मराठा मंडळ सांंस्कृतिक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त करतांना सांगीतले, सध्या तालुक्यातील मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या पिछेहाट होत आहे. त्यामुळे सर्व स्तरावर समाजाची अपरिमित हानी होत आहे. याशिवाय समाजातील हुषार होतकरू तरूण विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. त्यांना शैक्षणिक, सामाजिकदृष्या उपेक्षित राहावी लागत आहे. याचा विचार करून निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येवून समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी केले पाहिजे हा उद्देश ठेवून 2 वेळा प्राथमिक बैठका घेतल्यानंतर येत्या दि. 27 रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे दुपारी 4 वा. मराठा मार्गदर्शन मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री नामदार संतोष लाड आणि माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या बैठकीनंतर समाजोन्नतीसाठी व्यापक रूपरेषा आखून काम करण्यात येईल. मागील काळात झालेल्या उणीवा भरून काढण्यासाठी कोणताही भेद न ठेवता मराठा समाज एकाच छताखाली आणण्यासाठी काम केले जाईल. याकामी सर्व मराठा बांधवांनी तन,मन, धनाने सहकार्य करण्याची भुमिका घेतली असून 27 तारखेला होणाऱ्या या मेळाव्याच्या पार्श्वभुमिवर मराठा समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून हा मेळावा अभुतपूर्व यशस्वी करण्याकरीता प्रत्येकाने जबाबदारी स्विकारावी मोठ्या संख्येने हजर राहून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवावे. यामध्ये माता-भगिनींनीही मोठ्या संख्येने सहभागी होवून ही समाजाच्या विकासाची चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


