संकेश्वरात तलवार हल्यात युवक गंभीर जखमी
संकेश्वर,ता.25(प्रतिनिधी)-
संकेश्वर-निडसोसी रस्ता येथील शिडल्याळी घराच्या आवार भिंती जवळ सोमवार दि.23 रोजी रात्री 9 च्या सुमारास अज्ञात वाहनातून आलेल्या चौघा अज्ञात हल्लेखोरांनी दत्तात्रेय एस.थोरवत यांच्या डोक्यासह मानेवर व उजव्या हाताच्या मनगटावर तलवारींने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद माजी नगरसेवक श्रीकांत ऊर्फ पिंटू परीट यांनी संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.हल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्ता थोरवत यांना अधिक उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले.
तलवार हल्याची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली .जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी संकेश्वर पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी पोलीस उपनिरीक्षक यु.एस शेट्टेण्णावर यांना तलवार हल्लेखोरांना गजाआड करण्याविषयी कांही महत्वपूर्ण सुचना दिली आहे.सोमवार रात्रीपासून पोलीस यंत्रणा हल्लेखोरांच्या मागावर असून संकेश्वर-निडसोसी रस्त्यावरील ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटेजच्या आधारे हल्लेखोरांचा तपास लावला जात आहे.
23 रोजी रात्री 9 वाजता माजी नगरसेवक श्रीकांत दत्तू परीट आणि दत्तात्रेय एस थोरवत हे दोघे आपापल्या मोटारसायकलने संकेश्वर-निडसोसी मार्ग घराकडे परतत असताना शिडल्याळी घराच्या आवार भिंती जवळ सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दत्ता थोरवत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.धडकेने दत्ता थोरवत रस्त्यावर कोसळले असता अज्ञान वाहनात दबा धरून बसलेले हल्लेखोर नंग्या तलवारी घेऊन वाहनातून बाहेर पडले.त्यानी लागलीच रस्त्यावर कोसळलेल्या दत्ता थोरवत यांच्या मानेवर उजव्या हाताच्या मनगटावर तलवारने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दत्ता रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर निपचित पडून राहिल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून काढता पाय काढून घेतल्याचे सांगितले जात आहे.हल्लेखोरांच्या तावडीतून पिंटू परीट बचावले आहेत.अज्ञात हल्लेखोरांनी दत्ता थोरवत यांच्यांवर कोणत्या कारणास्तव हल्ला केला.याची माहिती अद्याप मिळालेली नाही.संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु एस शेट्टेण्णावर घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.


