वीज क्षेत्रातील योध्यांचा सन्मान करणारा ‘लाईनमन दिन’
ग्राहकांनी महावितरण चा टोल फ्री क्रमांकास (१९१२ / १९१२०/ १८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५) फोन करावा
कोल्हापूर ता.6 (विश्वजीत भोसले, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी) : महावितरणच्या ‘लाईनमन यांच्या कामाची दाखल घेणे, त्यांच्या कामास सन्मान मिळवून देणे, लाईनमन व वीज ग्राहक यांच्यात वीज सुरक्षेची जागृती करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून ‘लाईनमन दिन’ कोल्हापूरात साजरा होत आहे.
वीज ही आधुनिक युगातील सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. घरगुती वापर, शेती, उद्योग, रुग्णालये, शिक्षण, दळणवळण व्यवस्था—प्रत्येक क्षेत्र वीजेवर अवलंबून आहे. या अखंड वीजपुरवठ्यामागे जे कर्मचारी दिवस-रात्र, ऊन-पाऊस, वादळ-वारा यांची पर्वा न करता कार्य करतात, ते म्हणजे लाईनमन, त्यांना आपण वायरमन या नावानेही ओळखतो. लाईनमनच्या तत्पर सेवेने समाज व अर्थव्यवस्था स्थिर राहते. त्यांचे योगदान अनेकदा पडद्यामागे राहते; परंतु त्यांच्या अथक परिश्रमांशिवाय आधुनिक जीवनाची गती अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवेचा गौरव करण्यासाठी ‘लाईनमन दिन’ साजरा केला जातो. लाईनमन हे फक्त तांत्रिक कर्मचारी नसून ते आपत्कालीन परिस्थितीत धावून जाणारे पहिले योद्धे आहेत.
आज वीज ही मुलभूत गरज असल्याने यंत्रणेतील बिघाड तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असते. लाईनमन ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने व तत्परतेने पार पाडतात. याचा अनुभव आपण कोरोना काळात घेतला आहे. कोरोना काळात वीज पुरवठा सुरळीत नसता तर आरोग्य यंत्रणा, प्रशासन व घरात राहिलेला प्रत्येक नागरिकास किती यातना झाल्या असत्या हे न कल्पलेले बरे. हेच काम करताना महावितरणचे काही वीज योद्धे धारातीर्थी पडले आहेत, या दिवशी त्यांचीही आठवण आवर्जून काढावी लागेल.
लाईनमन च्या कार्यात तांत्रिक कौशल्याबरोबरच संयम, धैर्य आणि तत्परता या गुणांची आवश्यकता असते. ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद देताना त्यांना अनेकदा ताणतणावाला सामोरे जावे लागते; परंतु तरीही ते सेवाभाव जपून काम करतात. ग्रामीण भागात, जिथे रस्ते व वाहतूक सुविधा मर्यादित असतात, तिथेही ते वेळेवर पोहोचून सेवा देतात. मागे राज्यात आलेल्या निसर्ग – तोक्ते सारख्या चक्री वादळात याच लाईनमननी जीवाचे रान करत वीज यंत्रणा पूर्ववत केली होती. पूर स्थितीत अनेकदा धोके पत्करत, पोहत जात याच लाईनमननी अनेकदा वीज पुरवठा सुरळीत करतात. वीज पुरवठा खंडित झाला की चोवीस तास कार्यरत असणारे लाईनमन हे तात्काळ जागेवर पोहचून काम करतात. अशा स्थितीत ग्राहक म्हणून आपण वारंवार फोन न करता महावितरण टोल फ्री क्रमांकास (१९१२ / १९१२०/ १८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५) फोन केला तर त्यांना काम करण्यास पुरेसा वेळ मिळतो व अपघाताची शक्यताही कमी होते.
लाईनमन दिन निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत सुरक्षा उपकरणे, नियमित प्रशिक्षण यावर महावितरण भर देते आहे. लाईनमनचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दरवर्षी काही लाईनमन अपघातात जखमी होतात किंवा क्वचित प्रसंगी प्राण गमावतात. त्यामुळे सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित होते. यामध्ये कर्मचारी काम करताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर करणे, हेल्मेट, हातमोजे, सेफ्टी बेल्ट यांचा वापर अनिवार्य करणे, सुरक्षेबाबत यादिवशी व नियमित प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणे हे उद्देशही समोर ठेवून हा दिवस साजरा केला जातो. महावितरण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही सर्व सुरक्षा साधने नियमितपणे उपलब्ध करून देत असते. या दिवसाचे औचित्य साधून महावितरण संपूर्ण राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लाईनमनचा सत्कार, प्रशस्तीपत्र व पुरस्कार वितरण, कुटुंबीयांचा गौरव, वीज सुरक्षिततेची सामुहिक शपथ असे विविध कार्यक्रम आयोजित करते. या विशेष दिवशी सर्व लाईनमन बांधवांना मनःपूर्वक अभिवादन! त्यांच्या समर्पणामुळेच आपल्या जीवनातील प्रकाश कायम तेजस्वी राहतो.
00000


