निपाणीत कृषी महोत्सवाला जनावारे, उपकरणे आणि विविध स्टॉलने गर्दी

बुटकी राधा म्हैस,खिलारी गाय अन् हार्वेस्टीग मशीनही महोत्सवात
निपाणी,(प्रतिनिधी)-
जोल्ले गु्रपच्या आणि श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना, बिरेश्वर सौहार्द संस्थेच्या माध्यमातून होत असलेले श्री हालसिध्दनाथ साखर कारखाना कार्यस्थळावर सुरू असलेल्या कृषी महोत्सावाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. भव्य दिव्य उभारलेल्या 18 एकरातील शामीयानाने कृषी प्रदर्शनाची भव्यता लक्षात येते. योग्य नियोजन आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
या महोत्सवात 300 हून अधिक स्टॉल लागले असून या ठिकाणी चार चाकी वाहनापासून ट्रॅक्टर, ऊस तोडणी मशिनपर्यत वाहने आणि त्यांना लागणारी उपकरणे उपलब्ध आहेत. तर शेतीविषयी खुरपणीच्या मशिनपासून, पाणी फवारणी, सौर उर्जा योजना, पाईप, मोटर, विद्युत उपकरणे, औषधे, बी-बियाणे यातील आधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. तसेच जनावर प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी राधा म्हैस, सर्वात उंच खिलारी बैल, 7 फुट लांब 7 फुट रूंदीचा 900 किलोचा कोळीगुड बैल, तामिनाडूचा उमळेरी बैल, बुटकी गाय, खिलारी गाय, पुंंगनूर गाय, डांगी गाय, कपिला गाय, लालकंधार गाय, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोल्हापूरचा सर्व कांहि ऐकणारा भैरू रेडा, वासरू, शेळी, 12 किलोचा टर्की कोंबडा, गिनी फाऊल, खांबी कॅम्पबेल पदके, गिज राजहंस असे पक्षूपक्षी, जनावारे प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात नागरीकांचे लक्ष वेधत आहेत.
तसेच खवय्यासाठी कोल्हापूरचा मटका बिर्याणी ते तांबडा, पांंढरापासून भेल, थालीपीठ, आयस्किम, बिस्कीटे, ताक, लस्सी, भेल गाडे असे अनेक खाधपदार्थांचे स्टॉल आणि विविध खेळाचे स्टॉल, झोपाळे, झुंबर आणि अनेक खेळ उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमाने प्रदर्शन भव्य दिव्य झाले आहे. भव्य प्रमाणात असणारी विद्युत रोषणाई, रात्रीचे विविध करमणूकीचे खेळ आणि गाण्याचे कार्यक्रम कृषी उत्सवाला रंगत आणत आहे.


