लाभार्थ्यांशी चर्चा करून घरकुलांचे वाटप करण्यात यावे-बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे.
निपाणी,ता.19(प्रतिनिधी)-
घरकुलासंदर्भात ज्यांनी एक किंवा दोन हप्ते भरलेत त्यांना उर्वरित हप्त्याची रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत नगरपालिकेने द्यावी. यासंदर्भातील सूचना अधिकृतरित्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून द्यावी, पंधरा दिवसानंतर रक्कम भरलेल्यांची यादी सार्वजनिक करावी. यादीतील लाभार्थी गरजू आणि पात्र आहेत का? यासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत द्यावी, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांशी चर्चा करून घरकुलांचे वाटप करण्यात यावे अशा सूचना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या
निपाणीत घरकुल वितरणसंदर्भात नागरिकांच्यावतीने नगरपालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी नगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. स्वागत आयुक्त गणपती पाटील यांनी केले.
चिंगळे पुढे म्हणाले, निपाणीत साकारलेल्या घरकुल प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 1 लाख 50 हजार रुपये तर राज्य सरकारकडून 1 लाख 80 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. घरकुल वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा सर्वांना विश्वासात घेऊन करणे आवश्यक आहे. घरकुल हस्तांतरण कार्यक्रम झाल्यास त्याच्या अध्यक्ष आमदार असणार त्याबद्दल दुमत नाही.मात्र घरकुलांचे हस्तांतरण हे खासदार आणि पालकमंत्र्यांच्या हस्तेच होईल, राजकीय दबावाखाली श्रीमंत लोकांना घरांचा लाभ न मिळता गरजूंनाच मिळणे आवश्यक आहे.यासाठी घरकुल वाटप प्रक्रियेमध्ये पारदर्शकता महत्त्वाची आहे. 1812 लोकांची जी यादी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पहिल्या कार्यकाळात आश्रय कमिटीच्या माध्यमातून मंजूर झाली आहे तीच यादी अंतिम असणार आहे. घरकुलांचे वाटप करताना जात, धर्म किंवा पक्षभेद होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील यांनीही घरकुल वाटप करताना कोणावरही अन्याय होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
बैठकीस किरण कोकरे, झाकीर कादरी, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, ॲड. संजय चव्हाण, प्रतीक शाह, युवराज पोळ, किसन दावणे, अशोक लाखे, शामराव पुंडे, दिलीप जाधव, जीवन घस्ते, लोकेश घस्ते, किरण पाटोळे, अमित जाधव, मंगल घोरपडे, अमोल बन्ने, प्रमोद पाटील, शरीफ बेपारी, प्रवीण हेगडे, विनोद बल्लारी, फरीदा बुखारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


