संकेश्वरात निलगार गणेश दर्शनासाठी भाविकांचा लोटला जनसागर
संकेश्वर,ता.27(प्रतिनिधी)-
संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तांची अलोट गर्दी झाली होती.हेद्दुरशेट्टी व पाटील गल्ली अरुंद असल्याने येथे भक्तगण दाटीने उभे राहिल्यांने थोडा चेंगराचेंगरीचा प्रकार घडला.
शासनाच्या महिला मोफत प्रवासामुळे शालेय मुली कॉलेज युवती आणि महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजर दिसल्या.राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली “शक्ती“ योजना निलगार गणपती उत्सवात भारी ठरतांना दिसत आहे. गेल्या 13 दिवसांत महिलांना निलगार गणपती दर्शनासाठी“शक्ती“योजनेचा पूरेपूर लाभ घेतलेला दिसतो आहे.आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने निलगार बाप्पांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्रप्रदेश येथून जनसागर लोटलेला दिसला.त्यात महिलांची संख्या प्रकर्षाने मोठी होती.निलगार गणपती दर्शनासाठी हेद्दुरशेट्टी निवासस्थान ते थेट भिमनगर आणि श्री शंकराचार्य संस्थान मठापर्यंत भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसल्या.अलोट गर्दीत देखील लाखो भाविकांनी निलगार गणपती दर्शनाचा लाभ घेतला.गर्दीचा अंदाज घेत बरेच भाविक दर्शनाविना परतले.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता संकेश्वर पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी गांधी चौक येथे पोलीस व्हॅन रस्त्या मधोमध उभी करुन लोकांना दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगेत सोडण्याचे प्रयत्न केले.निलगार गणपतीचे प्रमुख शिवपूत्र हेद्दुरशेट्टी,वीरभद्र हेद्दुरशेट्टी हनुमंत हेद्दुरशेट्टी यांनी भक्तगणांना रांगेत उभे राहून शांततेने निलगार बाप्पांचे दर्शन घेेण्याचे आवाहन केले आहे.संकेश्वरचा जुना पीबी रोड,कमतनूर वेस, सुभाष रस्ता, आझाद रस्ता नदी गल्ली मठ गल्ली नवी गल्ली भाविकांनी फुलून गेलेली दिसली. निलगार गणपती दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने पोलीस यंत्रणा तोकडी पडलेली दिसली.हेद्दुरशेट्टी गल्ली -पाटील गल्ली अरुंद असल्याने भाविकांची गर्दी रोखण्यासाठी पोलीसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.


