आर्थिक साक्षरता आजच्या काळाची गरज – डॉ. श्रीकृष्ण महाजन
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वेगावर स्वार व्हायचे असेल तर आपण आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे.
कोल्हापूर.(प्रतिनिधी) २१ वे शतक हे अनेक बदलांना आपल्या सोबत घेऊन चालले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वेगावर स्वार व्हायचे असेल तर आपण आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख प्रो. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले होते. डॉ. महाजन यांनी ज्ञान, वर्तन, दृष्टिकोन, हे आर्थिक साक्षरतेत कशी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे दैनंदिन उदाहरणासह पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. आर. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात तंत्रज्ञान जेवढे व्यापक झाले आहे. तितके यामाध्यमातून होणारे फसवणूकीचे प्रकार वाढले आहे. आपली डिजिटल फसवणूक झाल्यास आपण घाबरून न जाता पोलिसांची मदत घ्यावी. असे आवाहन उपस्थितांना केले. ह्या कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डी. आर. के. कॉमर्स कॉलेजचे डॉ. ए. एस. बन्ने, न्यू कॉलेजच्या वाणिज्य विभागाचे डॉ. ए. जी. सूर्यवंशी व एन. डी. पाटील महाविद्यालयाच्या डॉ. एस. एस. लवेकर ह्या उपस्थित होत्या.
शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी योजनेअंतर्गत अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली. ह्या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डी. आर. भोसले, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. उबाळे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. एम. बी. देसाई, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके व कोल्हापूर परिसरातील अग्रणी महाविद्यालयातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. पी. डी. पुदाले, सूत्रसंचालन डॉ. बी. बी. घुरके तर आभारप्रदर्शन डॉ. बी. वाय. सायमोते यांनी केले.


