बोरवडेतील दोन भावांनी अल्प खर्चात बनवले भात मळणी मशीन
बोरवडे : येथील शेतकरी युवराज व रविंद्र साठे या बंधूनी बनवलेले अनोखे भात मळणी यंत्र .
बिद्री ता. ५ (प्रतिनिधी) सध्या भातकापणीचा हंगाम जोमात सुरु असून शेतमजुरांच्या कमतरतेमुळे कापणीला विलंब होत आहे. या समस्येवर मात करत कागल तालुक्यातील बोरवडे येथील युवराज आणि रविंद्र पांडूरंग साठे या दोन भावांनी देशी जुगाड करुन अल्प खर्चात भात मळणी मशीन बनवले आहे. या मशिनने एक लीटर पेट्रोल खर्चात म्हणजे फक्त शंभर रुपयात १० पोती भाताची मळणी केवळ एक तासात होत आहे.
जिल्ह्यात भात पिकाचे उत्पादन आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळी पिकासोबतच पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी उन्हाळ्यातही भाताचे पिक घेतले जाते. भाताची पेरणी किंवा रोप लागवड करण्यापासून ते भात कापणीपर्यंत मशागतीची भरपूर कामे करावी लागतात. यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज लागते. परंतू कालपरत्वे तरुण पिढी शेतीपासून दूर जात असल्याने शेतीत मजुरांची कमतरता भासत आहे.
या अडचणीचा विचार करुन युवराज आणि रविंद्र साठे यांनी अनोखे भात मळणी मशीन बनवले आहे. यासाठी त्यांनी पत्र्याचे रिकामे बॅरेल घेऊन त्याला आतून लोखंडी पट्टी आणि लाकडी फळी बसवली आहे. या यंत्राला पट्ट्याच्या सहाय्याने साडेसहा एचपीची मोटर जोडली आहे. हे यंत्र पेट्रोलवर चालत असून एक तासात केवळ एक लीटर पेट्रोलमध्ये १० पोती भाताची मळणी होते. या कामासाठी केवळ तीन ते चार लोकांची गरज असून दिवसभरात दोन ते तीन एकर भाताची कापणी शक्य होते.
अभियांत्रिकीचे कोणतेही शिक्षण नसताना युवराज व रविंद्र यांनी स्वतःच्या कल्पनेने या मशीनची निर्मिती केली आहे हे विशेष. या मळणी मशीनची रचना साधी व सोपी असल्याने त्याची वाहतूकही सहज करता येते. अडचणीच्या शिवारात नेण्या-आणण्यासाठी कोणतीच समस्या येत नाही. शिवाय मळणी होताना संपूर्ण लोंब्या रिकाम्या होतात. त्यामुळे भात वाया जाण्याची भिती नसते. या यंत्राची निर्मिती करण्यासाठी केवळ १६ हजार रुपयांचा खर्च आला असून ते दीर्घकाळ टिकणारे आहे.
या यंत्राच्या साहाय्याने साठे बंधूनी सुमारे शंभर पोती भाताची मळणी केली आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याची भावना शेतकरी व शेतमजूर यांनी व्यक्त केली आहे.
भात पिकाची कापणी करताना मजूर मिळत नाहीत ही मोठी समस्या आहे. शिवाय भात कापणीचे मोठे मशीन अडचणीच्या शिवारात नेता येत नसल्याने आपल्याला हे यंत्र बनविण्याचे सुचले. केवळ १६ हजार रुपयांत आपण हे यंत्र बनवले आहे. याचा परिणाम खुपच चांगला असून आपण शंभर पोती भात या मशीनने मळले आहे. ” असे मत रविंद्र साठे (मशीन निर्माता शेतकरी ) यांनी व्यक्त केली.


