हळदी येथे टॉन्सफॉर्म चोरी
400 एकरातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती
हळदी (प्रतिनिधी) कुर्डू ता. करवीर येथील उदय सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा भोगावती नदीकाठावर हळदी येथे बसवलेला टॉन्सफॉर्म अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे सुमारे 400 एकरातील ऊस पिकासह इतर उभी पिके गंभीर धोक्यात आली आहेत. तसेच संस्थेचे सुमारे 10 लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीही याच संस्थेचा टॉन्सफॉर्म चोरीला गेला होता. त्यानंतर बसवलेल्या नवीन टॉन्सफॉर्म मधील कॉपर वायर इतर साहित्य चोरट्यांनी बसवल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी रात्री नेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. नुकसानीची भरपाई होण्याआधीच पुन्हा चोरी झाल्याने संस्थेची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीत अडचणी निर्माण झाल्या असून रब्बी हंगामातील उभी पिकेही पाण्याअभावी कोमेजण्याच्या स्थितीत आहेत. संस्थेचे 400 सभासद या परिस्थितीमुळे मोठ्या चिंतेत आहेत.
गेल्या सहा महिन्यांत करवीर परिसरात टॉन्सफॉर्म चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये संताप असून पोलिसांनी या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले, “टॉन्सफॉर्म चोरीमुळे आमच्या 400 एकरातील ऊस पिकासह सर्व उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. संस्था आर्थिक संकटातून जात आहे. या परिस्थितीत शासनाने तात्काळ अनुदान देणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या मदतीशिवाय संस्था पुन्हा उभी राहणे कठीण आहे.”


