मा. शरद पवारसाहेब सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व : अनिल पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते.
कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व शरद पवार साहेब यांच्या आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर गेल्या साठ वर्षाच्या त्यांच्या राजकारणाचा, विचार आणि कार्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस हाच राहिला आहे. असे मत कर्मवीर शिक्षण संस्था कामेरीचे अध्यक्ष मा. अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे मा. पवार साहेब यांच्या पंचाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘शरदपवारसाहेब आणि रयत शिक्षण संस्था’ ह्या विशेष व्याख्यानात बोलत होते. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांमध्ये सुरू झालेले भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्र, गुरुकुल, इंटरअॅक्टीव्ह पॅनेलच्या मदतीने केले जाणारे अध्यापन, ए. आय. चे शिक्षण ह्या नव्या गोष्टींचा प्रारंभ ही त्यांच्याच दूर दृष्टीची कमाल आहे. हे करत असताना रयत शिक्षण संस्थेचे राजकारण कधी आणले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. त्यांनी कृषीमंत्री असताना केलेली सर्वांत मोठी कर्ज माफी, सरंक्षणमंत्री असताना सैन्य दलात महिला भरतीचा घेतलेला निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थातील महिलांचे आरक्षण, भटक्या विमुक्त जमातीच्यासाठी आरक्षण अशा अनेक पैलूवर प्रकाश टाकला. मा. पवार साहेब महाविद्यालयीन जीवनापासून इतरांचे दु:ख समजून घेवून ते आपल्या परीने सोडविण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारावा. असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा. डी. एम. गायकवाड, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. बी. शेळके, उपप्राचार्या,प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, डॉ. ए. पी. उबाळे, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक श्री. बी. एम. शिंदे व सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रो. डॉ. एम. ए. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जे. ए. कांबळे यांनी व आभारप्रदर्शन डॉ. बी. बी. घुरके यांनी केले.


