कुडित्रे फॅक्टरी साईटवर अग्निशामन दलाची स्थापना करावी
: सांगरूळ व बीड परिसरातील जनतेची मागणी
सांगरूळ ता. (प्रतिनिधी) : कुडित्रे फॅक्टरीवर अग्निशामक कक्ष स्थापन करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेउन केली आहे, याप्रकरणी प्रकाश मुगडे यांनी पुढाकार घेतला आहे.
बहिरेश्वर येथील विलास उर्फ उल्हास गोसावी यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली व आगीमुळे नुकसान झालेल्या घटनेची सविस्तर माहिती निवासी जिल्हाधिकारी यांना दिली, कसबा बीड परिसरातील लोकांना आकस्मित आगीच्या घटना घडल्यास त्यांचे संसार वाऱ्यावरती पडतात सर्व विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि अगोदरच मातीची, लाकूड वापरून निर्माण केलेली घरे व घरात असलेला गुरांचा चारा आग लागण्यास भीषण परिस्थिती निर्माण होते आणि जवळच अग्निशमन दलाचा कोणताही कक्ष नसल्यामुळे तीस ते पस्तीस किलोमीटर वरून अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत त्याची भीषणता वाढत जाते याची सर्व माहिती मुगडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना दिली.
बहिरेश्वर मध्ये आकस्मिक लागलेल्या आगीमुळे प्रापंचिक साहित्य तसेच जनावरांचा चारा जळून खाक झाले. सुदैवाने जिवीतहानी टळली. श्री गोसावी अत्यंत गरीब असून ऊसतोड तसेच मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना भरीव अशी मदत मिळावी अशी विनंती केली वरीलप्रमाणे कुंभी कासारी परिसर तसेच सांगरूळ, आमशी, म्हारूळ, बहिरेश्वर, गणेशवाडी, धोंडेवारी, बोलोली, खाटांगळे तसेच बारा वाड्यावस्त्या तसेच कळे, गगनबावडा व बाजारभोगाव, परिसरात जंगलाला आग लागणे तसेच घराला आग लागणे, अशा बऱ्याचशा दुर्देवी घटना घडलेल्या आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून कुडित्रे फॅक्टरीवर अग्निशामक कक्ष स्थापन करावा. या भागातील नागरिकांना व गोरगरिब शेतऱ्यांना याचा लाभ घेता येईल. करवीर, पन्हाळा, गगनबावडा परिसरात याचा लाभ होईल, अशा मागणीचे निवेदन प्रकाश मुगडे यांनी दिले, त्यांच्यासोबत आकाराम पाटील, विष्णू पाटील सरपंच पासर्डे, कृष्णा पाटील आमशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


