विकसित भारतासाठी सार्वजनिक आरोग्याची चळवळ गरजेची – डॉ. आशिष जोशी

0
'सार्वजनिक आरोग्य-सामाजिक परिवर्तनाचे साधन' या विषयावर उपस्थितांशी संवाद

अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेम्फिसाचे अधिष्ठाता डॉ. आशिष जोशी यांचे प्रतिपादन .

कोल्हापूर  (प्रतिनिधी):  केवळ आजार आणि औषधोपचार म्हणजे आरोग्य नव्हे, तर ताण तणाव, निराशा हे देखील आरोग्यापुढील मोठे संकट आहे. देशातील जनतेचे आरोग्य जेवढे चांगले तेवढा विकासाचा वेग जास्त असल्याने विकसित भारतासाठी सार्वजनिक आरोग्याची चळवळ गरजेची असलेल्याचे अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेम्फिसाचे अधिष्ठाता डॉ. आशिष जोशी यांनी केले.

          येथील मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘सार्वजनिक आरोग्य-सामाजिक परिवर्तनाचे साधन’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना  अमेरिकास्थित डॉ. आशिष जोशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात चुकीची जीवनशैली अंगिकारल्याने मानवाच्या आरोग्याशी निगडीत अनेक समस्या, आजार निर्माण होत आहेत. भौतिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमुळे जीवन शैली बदलली आहे. याचा परिणाम नवीन पिढीच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

       मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, विस्तार अधिकारी सौ. जयश्री जाधव, प्राचार्य डॉ गजानन खाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.पी.माळवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

       पुढे बोलताना डॉ. आशिष जोशी म्हणाले, सार्वजनिक आरोग्य हे केवळ रोगांवर उपचार नसून सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. या संकल्पनेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. सुसंस्कृत व चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योजकता, संशोधन, नवनिर्माणा बरोबर निरोगी आरोग्याची गरज आहे. निरोगी जीवनशैलीसाठी प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आरोग्याच्या बाबतीत सजग रहावे असे आवाहन डॉ. आशिष जोशी यांनी केले.

     प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. बी.पी.माळवे यांनी तर सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *